‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत धडगाव तालुक्यातील त्रिशूळ येथे लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन संपन्न!
दुष्काळाच्या परिस्थतीत ग्रामीण भागात जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत आणि पाण्याचा साठा वाढवण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान - २०२६’ अंतर्गत धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत त्रिशूळ येथे लोकसहभाग आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते या वनराई बंधाऱ्याचे जलपूजन करण्यात आले.
लोकसहभाग आणि श्रमदानाचा उत्तम वस्तुपाठ.
ग्रामपंचायत त्रिशूळ येथील ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने एकत्र येत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत श्रमदान करून हा बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे स्थानिक परिसरात पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून कामाची पाहणी.
जलपूजनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी बंधाऱ्याच्या साठवण क्षमतेविषयी आणि कामाच्या स्वरूपाविषयी सविस्तर माहिती घेतली. लोकसहभागातून झालेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तसेच विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Follow Us:

