पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी आता अनावश्यक कागदपत्रे अन् फॅमिली फोटो मागता येणार नाही; शिक्षण विभागाची नवी नियमावली जाहीर
(नंदुरबार) खाजगी विनाअनुदानित शाळांमधील पूर्व प्राथमिक (नर्सरी, ज्युनिअर केजी, प्री-प्रायमरी) प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क आकारणीतील मनमानी रोखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मानक कार्यपद्धती (SOP) जाहीर केली आहे.
- अनावश्यक कागदपत्रे व डोनेशनला बंदी: प्रवेशासाठी पालकांकडे आयकर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, मुलासोबतचा फॅमिली फोटो किंवा इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. तसेच प्रवेशासाठी देणगी (डोनेशन), कॅपिटेशन फी, अनधिकृत शुल्क आकारणे आणि विद्यार्थी-पालकांची मुलाखत किंवा चाचणी (स्क्रीनिंग) घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
- अचानक तपासणी आणि कारवाई: प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी करणार आहेत. नियमभंग करून देणगी किंवा अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- बोगस प्ले-स्कूलवर कारवाई: जिल्ह्यात अनेक अनधिकृत आणि आवश्यक सुविधा नसलेले प्री-स्कूल व प्ले-स्कूल सुरू झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग व महिला आणि बालविकास विभागाची परवानगी नसलेल्या अशा बोगस शाळांवर कारवाई केली जाणार आहे.
- प्रवेशाचे वय: बालवाटिका-१ (नर्सरी) साठी किमान वय ३ वर्षांपेक्षा जास्त, बालवाटिका-२ (ज्युनिअर केजी) साठी ४ वर्षांपेक्षा जास्त आणि बालवाटिका-३ (सिनिअर केजी) साठी ५ वर्षांपर्यंत वयाची अट निश्चित करण्यात आली आहे.
Follow Us:

