गावागावांत वनराई बंधारे बांधून जलसाठ्याचे संवर्धन करा!
(नंदुरबार) दुष्काळ निवारणासाठी वर्षभर नियोजन करण्याचे मा. मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
हवामान बदलामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून उपलब्ध जलसाठा लवकर कमी होत आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृषी व वन विभागाच्या समन्वयातून गावागावांत वनराई बंधारे बांधावेत. रोजगार हमी योजना आणि ग्रामस्थांच्या सहभागातून वर्षभर जलसंधारणाची कामे राबवावीत, असे निर्देश महिला व बालविकास मा.मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार मा.ॲड. गोवाल पाडवी, मा.आमदार आमश्या पाडवी, मा.आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, मा.माजी खासदार डॉ. हिना गावित आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशनअंतर्गत ७० टक्के काम पूर्ण झालेल्या व उर्वरित कामांसाठी निधी आवश्यक असलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागांनी समन्वय साधावा. आगामी दोन वर्षे हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक असण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभागातून जलव्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बंधारे व जलसाठ्यांमधील गाळ काढून तो शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावा. यामुळे शेतजमिनीची सुपीकता आणि जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांनाही अन्य जिल्ह्यांत अंगणवाडीचा पोषण आहार उपलब्ध व्हावा, यासाठी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील सात ते आठ महिने सर्व संबंधित विभागांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दरमहा आढावा बैठक घ्यावी. तसेच पाणीटंचाई आराखड्यात दर तीन महिन्यांनी आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश मा.मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
Follow Us:

