‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी एसएनडीटी विद्यापीठात विशेष महिला रोजगार मेळावा
महिलांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना थेट उद्योग व आस्थापनांशी जोडणे तसेच कौशल्य विकास व स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे व ॲप्रेंटीसशीप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधीबाबत मार्गदर्शन करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. याचा लाभ घेण्यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सुनिल पवार, डॉ. हेमलता बागला (अति. कार्य.) आणि कुलगुरू श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी केले आहे.
मुंबई शहर व परिसरातील सेवा व उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांना या माध्यमातून त्यांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ थेट निवडण्याची मोठी संधी मिळणार आहे. १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि इतर व्यावसायिक कौशल्य असणारे सर्व पात्र महिला उमेदवार या मेळाव्यात व प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी त्वरित https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जाऊन आपली पूर्व-नोंदणी पूर्ण करावी.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण राज्यभर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्याचा अधिकृत तपशील खालीलप्रमाणे आहे.
दिनांक: २९ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी ९ वाजता
स्थळ: एसएनडीटी महिला विद्यापीठ परिसर, चर्चगेट
पात्रता: १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमाधारक व सर्व पात्र महिला उमेदवार.
मेळाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्यवस्था
Ø ३० स्टॉल्सची उभारणी : मेळाव्यात महिला उमेदवारांच्या सोयीसाठी एकूण ३० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.
Ø २०+ नामांकित आस्थापनांचा सहभाग : विविध क्षेत्रांतील २० हून अधिक कंपन्या व आस्थापना थेट मुलाखतींद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.
Ø ५ शासकीय महामंडळांचा सहभाग : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ प्रमुख शासकीय महामंडळे या मेळाव्यात सहभागी होत आहेत. ही महामंडळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, विविध शासकीय योजना, कर्ज सुविधा आणि इतर उपक्रमांची थेट माहिती देतील.
Ø कौशल्य विकास प्रशिक्षण : विविध कौशल्य प्रशिक्षण योजना व रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती देणारे विशेष स्टॉल्स येथे उपलब्ध असतील.
Ø जपानमधील रोजगाराच्या संधी : मेळाव्यात उमेदवारांना थेट जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकरीता एक स्टॉल चे नियोजन करण्यात आले आहे. ॲपरेंटसशिप, स्वयंरोजगार, परदेशी रोजगार संधी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मुंबई शहर मधील सर्व उद्योजकांनी आणि बेरोजगार महिलांनी या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळाव्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

