भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरा! धानोरा येथे विशेष शासकीय सेवा व लाभ वितरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी मा. आमदार विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले.
शिबिरात महसूल विभागामार्फत सातबारा उतारे, संजय गांधी निराधार अनुदान योजना प्रमाणपत्रे, नवीन शिधापत्रिका, अधिवास व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रे, पुरवठा विभागामार्फत साड्या, कृषी विभागामार्फत महिला शेतकरी प्रमाणपत्रे व बी-बियाणे, तर आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.
तसेच महिला व बालविकास आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध कल्याणकारी व शैक्षणिक योजनांची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा व योजनांचे लाभ उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दुर्गम भागातील पात्र नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ थेट पोहोचविणे आणि शासकीय सेवा सुलभ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

