‘चला शाळेत जाऊया’अभियानांतर्गत जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा येथे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांची भेट

महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधांसोबत शैक्षणिक गुणवत्तेलाही प्राधान्य देण्याबाबत भेटीदरम्यान डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शाळेतील विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची माहिती जाणून घेतली. शाळांमध्ये केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शिक्षकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शाळेतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन त्यांनी केले. पोषण आहार व्यवस्थेची पाहणी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शाळेतील शालेय पोषण आहार व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार, त्याची गुणवत्ता, स्वच्छता, पाककृती, आहाराचे नियोजन व व्यवस्थापन याबाबत त्यांनी माहिती घेतली. एकूण पोषण आहार व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भाषा-गणित पेटी व अध्ययन समृद्धी उपक्रमाची माहिती
भेटीदरम्यान शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचीही त्यांनी माहिती घेतली. भाषा- गणित पेटी, तसेच जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी उपक्रमाचा विद्यार्थ्यांकडून होणारा वापर, विद्यार्थ्यांची नोंदणी, उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनात होणारी प्रगती आणि शिक्षकांकडून केले जाणारे प्रयत्न याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती जाणून घेतली.
वर्गातील अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शाळेतील विविध वर्गांना भेट देऊन वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. शिक्षकांकडून वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग, प्रश्नोत्तरांची पद्धत, अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची विषय समजून घेण्याची क्षमता याबाबत त्यांनी बारकाईने माहिती घेतली.
विद्यार्थिनींशी आपुलकीने संवाद
यावेळी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी अतिशय आपुलकीने व मोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थिनींनी त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीबाबत, करिअरच्या विविध संधींबाबत, विविध क्षेत्रांतील उपलब्ध संधी तसेच आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. (भा.प्र. से) डॉ. नंदकुमार बेडसे यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. या संवादामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासोबतच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणा मिळाली.
अधिकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन
यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात आपली मते व सूचना मांडल्या. शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक बालक शिक्षणाच्या प्रवाहात यावे, शाळा गुणवत्तापूर्ण व सक्षम व्हावी आणि शैक्षणिक गुणवत्ता अग्रस्थानी राहावी, यासाठी शाळांनी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती
या भेटीवेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबारचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी, जिल्हा परिषद नंदुरबारचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे, शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत, प्रकाशा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. मनोज पिंजारी, डोंगरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत बागुल, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक गोपाल गावित, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.
मान्यवरांच्या या शाळाभेटीमुळे शिक्षक व विद्यार्थिनींना मोठी प्रेरणा मिळाली असून, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी ही भेट निश्चितच मार्गदर्शक ठरली आहे.

