तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला मिळणार प्रोत्साहन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश बुधवारी लोकभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ हायर अँड डिजिटल लर्निंग : इंडस्ट्री-अकॅडेमिया कोलॅबोरेशन फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयेबिलिटी’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.
‘कुलपती पदक’ हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची, नेतृत्वगुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारे असावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. पदकासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यापीठांनी पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित निकष निश्चित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

