
(नंदुरबार) जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या आणि संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले आहे. सातपुडा पर्वतीय रांगा, तोरणमाळ परिसर तसेच तापी नदी खोऱ्यातील पाण्याच्या पातळीवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खालील अधिकृत मार्गदर्शक सूचना व आदेश जारी करण्यात आले आहेत. अतिवृष्टी (मुसळधार पाऊस) आणि पूरसदृश परिस्थितीत नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खालील खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
धबधबे, नाले आणि ओढे याठिकाणी घ्यावयाची काळजी म्हणून अतिवृष्टीदरम्यान धबधबे, नद्या, नाले आणि तलाव यांसारख्या पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे. धबधब्यांच्या परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो (फ्लॅश फ्लड), त्यामुळे वाहत्या पाण्यात किंवा ओढ्यांमध्ये उतरू नये.
नदी, नाले किंवा पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहन पुढे नेण्याचा अथवा पायी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच पाण्याचा प्रवाह किंवा धबधब्यांच्या कडेला उभे राहून सेल्फी काढणे अत्यंत धोकादायक असून जीवघेणे ठरू शकते.
घरामध्ये पाणी भरण्याची शक्यता असल्यास तातडीने सुरक्षित किंवा उंचावरील ठिकाणी स्थलांतर करावे. घरात पाणी शिरल्यास घरातील मुख्य वीज पुरवठा (Main Switch) आणि गॅस सिलेंडर तातडीने बंद करावा.
जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती किंवा कमकुवत भिंतींच्या जवळ थांबू नये. तसेच रस्त्यावरील विजेचे खांब, उघड्या तारा किंवा डीपी (DP) पासून सुरक्षित अंतर राखावे आणि त्यांना हात लावू नये.
हवामान विभागाचा अंदाज पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. रस्त्यांवर पाणी साचलेले असल्यास वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. पाण्याचा अंदाज येत नसेल तर वाहन पुढे नेऊ नये.
वादळी वाऱ्यासह पाऊस असताना मोठी झाडे किंवा होर्डिंग्जखाली वाहने उभी करू नयेत अथवा थांबू नये.
अतिवृष्टीच्या काळात पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता असल्याने पिण्याचे पाणी नेहमी उकळून व गाळून वापरावे. घरात टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, पुरेसा खाद्यान्न साठा, आवश्यक औषधे तसेच महत्त्वाची कागदपत्रे प्लास्टिक पिशवीत सुरक्षित ठेवून इमर्जन्सी किट तयार ठेवावे.
हवामानाचा अंदाज, पूरस्थिती अथवा इतर आपत्कालीन बाबींविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत सरकारी माध्यमांवरून मिळणाऱ्या हवामान अंदाजावर आणि सूचनांवरच विश्वास ठेवावा.
अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता मानून जबाबदारीने वागावे, तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.















