अक्कलकुवा तालुक्यातील विकासकामांना गती द्यावी
(नंदुरबार) अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य व शिक्षणासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विकासकामांना गती द्यावी.
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे मा.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे मा.पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी मा.आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, आवश्यकतेनुसार टँकर व विंधन विहिरींची कामे करावीत तसेच जनावरांसाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करावे, असे निर्देश मा.पालकमंत्र्यांनी दिले. जलसंधारण, जलपुनर्भरण व पाणीसाठा वाढविणाऱ्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देत पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत महसूल, आरोग्य, पशुधन, कृषी, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, घरकुल, जल जीवन मिशन आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. मा.आमदार आमश्या पाडवी यांनी घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ, प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशासकीय मंजुरी आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याबाबत सूचना केल्या.
Follow Us:

