विज्ञापित

दिघीमध्ये देशातील सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र; ९० हजार रोजगार निर्मितीसह २७ हजार कोटींची गुंतवणूक होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिघी (जि. रायगड) येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्यात सामंजस्य करार पार पडला. यामुळे राज्यात ९० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
दिघीमध्ये देशातील सर्वात मोठे जहाजबांधणी केंद्र; ९० हजार रोजगार निर्मितीसह २७ हजार कोटींची गुंतवणूक होणार
dighi-greenfield-shipbuilding-hub-mdl-mou-maharashtra

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग ॲण्ड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एनशिपएमएल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.
या करारानुसार एमडीएलने दिघी येथे प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती शक्य होणार आहे.
देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढ, तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती आणि जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यास या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: