विज्ञान-गणित प्रदर्शनात एकलव्य निवासी विद्यालयाचे यश
‘शोध घ्या, नावीन्य आणा, प्रेरणा द्या’ (Explore, Innovate, Inspire) संकल्पना :
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गणितीय विचारसरणी, संशोधनवृत्ती आणि कल्पकतेला चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध भागांतील 17 शाळांनी सहभाग घेतला असून एकूण 68 नावीन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृती सादर करण्यात आल्या.
या चुरशीच्या स्पर्धेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटांत यश मिळविले:
• कनिष्ठ गट : इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कु. तनुजा स्वप्निल वळवी आणि कु. रोहिणी शेरसिंग पाडवी यांनी सादर केलेल्या ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक क्रेन’ या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
• वरिष्ठ गट : इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. सुहानी मोत्या नाईक हिने सादर केलेल्या ‘फॅक्टरी वेस्ट मॅनेजमेंट’ या प्रकल्पालाही तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या दोन्ही उत्कृष्ट प्रकल्पांची आगामी राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्या आणि पर्यावरण रक्षणावर आधारित वैज्ञानिक व गणितीय संकल्पनांचा प्रभावी वापर करून उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांसमोर त्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण अत्यंत आत्मविश्वासाने केले.
शाळेचे प्राचार्य अनिल मंगळे यांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले असून विज्ञान शिक्षिका सौ. प्रीती मॅडम आणि गणित शिक्षक जय शर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रकल्प व प्रतिकृती तयार करण्यासाठी विशेष तांत्रिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक व सर्वस्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

