दुष्काळग्रस्त शेतकरी, आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर – मंत्री ॲड. आशिष शेलार

रायगड-अलिबाग: आईच्या निधनानंतर गेल्या १० ते १२ वर्षांत दिवाळीचा सण मनापासून गोड वाटला नव्हता. मात्र, कर्नाळा येथील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेक वर्षांनंतर दिवाळीचा खरा आनंद अनुभवता आला, अशी भावुक व आपुलकीची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.
दुष्काळग्रस्त शेतकरी, आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर – मंत्री ॲड. आशिष शेलार
Govt Always Ready to Support Drought-Affected Farmers and Tribal Communities: Minister Adv. Ashish Shelar

रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील कलेगाव येथे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महापौर नितीन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती श्रीमती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संकट काळात बळीराजाच्या पाठीशी शासन..

यावेळी मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत जमा केली आहे. तसेच, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आपण मंत्रिमंडळात जोरदार मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी समाजाची लोककला, पारंपरिक नृत्य, गायन आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते जपण्याचे आवाहन करत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

विकासकामांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्रगती..

आमदार ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतून आदिवासी व दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पक्की घरे, गॅस सिलिंडर, शौचालय, सौरऊर्जा आणि विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचत आहेत. कोविडसारख्या महामंदीच्या काळातही गरीब कुटुंबांना आर्थिक मदत व मोफत अन्नधान्य पुरविण्यात आले. आदिवासी वाड्यांमध्ये रस्ते, समाजमंदिरे, घरकुल आणि विविध विकासकामे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आखाडवाडीत घरगुती फराळाचा आनंद व शेतीपूरक साहित्य वाटप..

मंत्री ॲड. शेलार यांनी आखाडवाडी आदिवासी वाडीतील रोशन वाघमारे यांच्या घरी जाऊन सहपरिवार दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. या स्नेहमेळाव्यात जिल्हा परिषदेच्या १५ टक्के निधीतून सात आदिवासी वाड्यांतील ३८९ कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचे वाटप करण्यात आले. तसेच, आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य व लोककलेच्या सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह निर्माण केला.

शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट आणि शेतीची पाहणी..

कार्यक्रमानंर मंत्री ॲड. शेलार व अन्य मान्यवरांनी शिरढोण येथील शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि दुष्काळामुळे अडचणीतील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या या थेट सहभागामुळे शासन आपल्या दारी आणि पाठीशी असल्याचा दृढ विश्वास रायगडमधील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या मनात निर्माण झाला.

 

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: