महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला ‘सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाइन’ पुरस्कार
यशोभूमीमध्ये येथे १ ते ३ सप्टेंबर दरम्यान आयोजित ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य ‘फोकस स्टेट’ म्हणून सहभागी झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात राज्याने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण या परिषदेतील लक्षवेधक प्रदर्शनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे व त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ऊर्जा विभागाच्या या दालनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘इंटरॲक्टिव्ह टच वॉल’ला मोठा प्रतिसाद मिळाला. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा यांच्या प्रमुख योजना, प्रकल्प आणि यशाची माहिती या डिजिटल माध्यमातून देण्यात आली. इंटरॲक्टिव्ह तंत्रज्ञान, व्हर्च्युअल अनुभव, डिजिटल माहिती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित रचना यामुळे हे दालन माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण ठरले आहे.

