भाजीपाला रोपांसाठी आता परराज्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही; कृषी विज्ञान केंद्राचा मोठा पुढाकार
(नंदुरबार) डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने 'प्रो-ट्रे तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने भाजीपाला रोपवाटिका निर्मिती' या विषयावर सहा दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील ३० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.
- उद्देश: नंदुरबार जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनासाठी लागणाऱ्या ६० टक्क्यांहून अधिक रोपांचा पुरवठा नाशिक तसेच गुजरात सीमेलगतच्या भागातून केला जातो. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना वाहतूक खर्च व अधिक किंमत मोजावी लागते. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातच शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिका उभारणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढवणे आणि कमी खर्चात दर्जेदार रोपे उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
- प्रात्यक्षिक व मार्गदर्शन: प्रशिक्षणादरम्यान प्रो-ट्रे तंत्रज्ञान, कोकोपीटचा वापर, बियाणांची निवड व पेरणी, रोपांची उगवण, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्हॅक्यूम सीडर यंत्राचा वापर व हाताळणीचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
- पूरक व्यवसाय: कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. वैभव गुर्वे आणि राजेंद्र दहातोंडे यांनी या प्रशिक्षणाचे समन्वय केले. हा व्यवसाय युवक व शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पूरक व्यवसाय ठरू शकतो आणि जिल्ह्यात भाजीपाला रोपांची मोठी मागणी असल्याने यात भविष्यात मोठ्या संधी आहेत, असे त्यांनी सांगितले.
Follow Us:

