जालन्यातील शाळांच्या सुविधांचा आढावा; ‘जालनाई सिल्क’ ब्रँडिंगला पालकमंत्री पंकजा मुंडेंची चालना
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, कंपाऊंड वॉल आदींची सद्यःस्थितीबाबत पाहणी करून येत्या पाच तारखेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश श्रीमती मुंडे यांनी दिल्या. जालना जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा, अंगणवाडी, आधुनिक ग्रंथालये आणि क्रीडांगणांच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जालनाई सिल्कच्या ब्रँडिंगसंदर्भात सादरीकरण करण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, जालना जिल्ह्यातील जालनाई सिल्कच्या उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठीय ओळख मिळवून देण्यासाठी तीन ते पाच वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन निश्चित करावीत. मोसंबी, स्थानिक दगडी जाळी व स्थापत्यशैली तसेच अजिंठा कलाशैलीपासून प्रेरित घटकांचा डिझाईनमध्ये वापर करण्याची शक्यता तपासावी. डिझाईनची संख्या मर्यादित ठेवून ती जालना जिल्ह्याची सहज ओळख बनतील, याकडे लक्ष द्यावे. यासाठी व्यावसायिक ब्रँडिंग सल्लागाराची मदत घेऊन उत्पादनांची गुणवत्ता, कच्चा माल, विणकामासाठी लागणारा कालावधी, कारागिरांची मजुरी, किंमत आणि विक्री व्यवस्था यांचा समावेश असलेला सविस्तर व्यवसाय आराखडा तयार करावा.
यावेळी जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा उपस्थित होते.

