हेलपाटे थांबले, हक्काचे लाभ मिळाले!

(नंदुरबार) शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पेन्शन आणि इतर लाभांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याच्या परंपरेला नंदुरबार जिल्हा परिषदेने पूर्णविराम दिला असुन मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून जानेवारी २०२६ पासून वर्ग-3 व 4 च्या कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ मंजुरीचे आदेश सन्मानपूर्वक वितरीत केले जातात.
हेलपाटे थांबले, हक्काचे लाभ मिळाले!
rounds-stopped-benefits-received

या यशस्वी उपक्रमांतर्गत नुकताच या उपक्रमाचा 10 वा पुष्प सोहळा जिल्हा परिषदेच्या ‘याहामोगी सभागृहात’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात पार पडला.
प्रशासकीय संवेदनशीलतेचा ‘नंदुरबार पॅटर्न’
सामान्यतः शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभांसाठी हेलपाटे मारावे लागतात. मात्र, नंदुरबार जि.प.ने प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानतेचा नवा वस्तुपाठ राज्यासमोर ठेवला आहे.
“कर्मचारी आपल्या आयुष्यातील ३० ते ३५ वर्षे प्रशासनाला आणि जनतेला सेवा देतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व हक्काचे लाभ देऊन सन्मानपूर्वक निरोप देणे, हे प्रशासनाचे केवळ काम नसून ते आमचे ‘कर्तव्य’ आहे.”
— श्री. नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार
‘नंदुरबार पॅटर्न’ची प्रमुख वैशिष्ट्ये:
• तात्काळ आर्थिक दिलासा: निवृत्तीच्या दिवशीच पीएफ (PF), ग्रॅच्युइटी आणि इतर देय लाभाचे मंजुरी आदेशाचे सन्मापुर्वक वितरण
• दप्तरदिरंगाईला पूर्णविराम: वयोवृद्ध वयात कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची कसरत थांबली.
• यथोचित सन्मान: शाल, स्मृतीचिन्ह आणि वाचन पुस्तक देऊन कर्मचाऱ्यांचा सत्कार.
सत्कारमूर्तींचे मनोगत व उपस्थिती
या सोहळ्यात सुरेश नामदेव कोळी, गंगाराम मनिलाल चौधरी, कमल गुलचंद सोलंकी, इंदिरा विठ्ठल परदेशी, संजय रोहिदास जाधव, इला खप-या गावित, रविंद्रकुमार छगनलाल साळुंके या निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबासह सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कामुर्ती सुरेश नामदेव कोळी यांचेसह इतर कर्मचा-यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सेवा लाभ मंजुरीचे आदेश वेळीच मिळाल्याने उपस्थित सत्कारमूर्तींनी भावूक होऊन प्रशासनाचे आभार मानले.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) गणेश भास्कर मोरे, शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती आसुर्डे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: