जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान ;14 ते 25 सप्टेंबरदरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे यंदा दुसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
आरोग्य तपासणीसह आवश्यक उपचारांची सुविधा
या समुदाय आरोग्य शिबिरांमध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ईसीजी तसेच विविध निदानात्मक व उपचारात्मक तपासण्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी व समन्वयक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
विविध संस्था व आरोग्य यंत्रणांचा सहभाग
जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्न रुग्णालये, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, डी.पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, पथराई, धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या जवळच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातील समुदाय आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

