धार्मिक भावना दुखावणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करा; हिंदु सेवा सहाय्य समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नंदुरबार:-चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत त्यावर भारत सरकारने बंदी सुध्दा घातली आहे. घातक अश्या चिनी फटाके आणि देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्र असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी दिले.
धार्मिक भावना दुखावणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करा; हिंदु सेवा सहाय्य समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
action-against-firecracker-sellers-hurting-religious-sentiments-hindu-seva-sahayata-samiti-memorandum

जिल्ह्यातील सर्व फटाके विक्री करणाऱ्यांची तपासणी करून असे फटाके आढळून आल्यास कारवाई आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात काढण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदनात म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये घातक अश्या विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करण्यासाठी ‘पोटॅशिअम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशिअम परक्लोराईड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते. भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असतांना चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्याची विक्री होत आहे, तरी त्यावर कारवाई करून त्याच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी.

तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच फटाक्यांवर चित्रांद्वारे हिंदू देवीदेवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना केली जाते ती पूर्णपणे थांबवावी व जे फटाके विक्रेते देवी- देवता यांची चित्रे असलेली फटाके विक्री करतील त्यांच्यावर भा.न्या.सं. कलम 297, 298 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, पंकज मुसळे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: