एकलव्य विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोनही महात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.चंद्रकांत देसले यांनी महात्मा गांधी यांची सत्य,अहिंसा व त्यांचे सत्याचे प्रयोग याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांचा मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी वस्तूंचा आग्रह व चलेजाव चळवळीतील गांधीजी यांची प्रमुख भूमिका विविध प्रसंगांसह विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील साधेपणा व त्यांचे उच्च विचार यासंबंधीचे विविध दाखले दिले.भारत पाकिस्तान युद्ध तसेच ताश्कंद करार यावेळी लालबहादूर शास्त्री यांची असलेली महत्वपूर्ण भूमिका याविषयीची विस्तृत माहिती प्रमुख वक्ते चंद्रकांत देसले यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, श्रीमती विजया न्हायदे, गौरीशंकर धुमाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अन्सार शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गौरीशंकर धुमाळ यांनी आभार मानले.

