अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!
यामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, ग्लेरिसिडीया, हदगा, अंजन, कडुनिंब, शेवरी, उसाचे वाढे, बाभळीच्या शेंगा, व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध वनस्पतींचा समावेश केला जातो. हे अपारंपारिक स्त्रोत केवळ जनावरांची भूकच भागवत नाहीत, तर त्यांना आवश्यक पोषक घटक पुरवून त्यांचे कुपोषण व मृत्यूपासून रक्षण करतात. अत्यंत कमी खर्चात व उपलब्ध संसाधनांमध्ये आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी अपांरपारिक चारा हा एकमेव शाश्वत व किफायतशीर उपाय ठरत आहे. हे चारा पर्याय अत्यंत कमी पाण्यात, निकृष्ठ जमिनीत, क्षारयुक्त पाण्यात व अगदी कमी देखभालीत येणारे जनावरांना उन्हाळयात आवश्यक प्रथिनांचा पुरवठा करतात व त्यांचे डीहायड्रेशन रोखतात. पारंपारिक चाऱ्याला पर्याय म्हणून नव्हे तर टंचाईच्या काळात जनावरांचे प्राण वाचवून कमी खर्चात दुग्धव्यवसाय व शेळीपालन वर्षभर फायदेशीर सुरु ठेवण्यासाठी हा एक शाश्वत मार्ग आहे. मात्र, प्रत्येक वनस्पतीची पौष्टिकता, पचनक्षमता आणि सुरक्षितता वेगवेगळी असते. त्यामुळे चारा योग्य प्रमाणात, इतर चाऱ्यासोबत मिसळून आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देणे आवश्यक आहे.
सुबाभूळ, हे जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक, बहुवार्षिक व दुष्काळात तग धरणारे एक मुख्य अपारंपारिक चारा पीक आहे. याला बहुगुणी वृक्ष आणि मिरॅकल ट्री देखील म्हटले जाते. हे पीक पडीक व हलक्या जमिनीवर कमी पाण्यात वेगाने वाढते.सुबाभळाची पौष्टिकता ही बरसीम किंवा लसून घास एवढीच उच्चदर्जाची मानली जाते. कोवळ्या पानांमध्ये व फांद्यांमध्ये 20 ते 25 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. तसेच चाऱ्याची पचनक्षमता 65 ते 70 टक्के पाचक असून जनावरे ती आवडीने खातात. यात जीवनसत्व अ व खनिजांचे प्रमाण भरपूर असते हे पीक कोणत्याही प्रकारच्या चोपण, खडकाळ, मुरमाड जमिनीत येऊ शकते. सुबाभळामध्ये मिमोसिन नावाचे विषारी अमिनो आम्ल असते. ज्यामुळे हा चारा देताना काळजी घ्यावी, सुबाभूळ कधीही एकटा चारा म्हणून देऊ नये, रोजच्या आहारात एकूण हिरव्या चा-याच्या 1/3 भाग सुबाभूळ व उरलेला भाग इतर गवत, मका किंवा कडबा मिक्स करुन द्यावा. सुबाभळीतील विषारीपणा कमी करण्यासाठी फांद्या कापल्यावर पाला 24 तास सावलीत सुकवून द्यावा.ग्लेरिसिडीया – ग्लेरिसिडीया हे जलद वाढणारे बहुवार्षिक झाड आहे. शेतकरी सहसा याचा वापर शेताच्या कुंपणासाठी किंवा बांधावर लावण्यासाठी करतात. टंचाईच्या काळात जनावरांना उच्च प्रथिने मिळवून देण्यासाठी व पशुखाद्याचा खर्च कमी करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कोवळ्या पानात प्रथिनांचे प्रमाण 20 टक्के ते 24 टक्के असते. यात कॅल्शियम, फॉस्फरस व लोह चांगल्या प्रमाणात असते.
पचनक्षमता 60 ते 65 टक्के आहे. ग्लेरिसिडीयाच्या ताज्या पानात एक विशिष्ट उग्र वास असतो, ज्यामुळे जनावरे सुरुवातीला हा चारा खाण्यास नकार देतात. त्यामुळे हा पाला कापल्यानंतर 5 ते 6 तास सावलीत सुकवावा. सुकवल्याने त्याचा उग्र वास निघून जातो व जनावरे तो आवडीने खातात. रोजच्या आहारात एकूण हिरव्या चाऱ्याच्या 15 ते 20 टक्के पेक्षा जास्त ग्लेरिसिडीया देऊ नये. मोठ्या जनावरांना रोज 2 ते 3 किलो तर शेळ्यांना 200 ते 300 ग्रॅम देणे पुरेसे आहे. हदगा- हदगा हे अत्यंत वेगाने सरळ वर वाढणारे झाड असून, पानांसोबतच याची मोठी पांढरी किंवा लाल फुलेही जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असतात. पानात प्रथिनांचे प्रमाण 25 ते 30 टक्के इतके प्रचंड असते (जे सुबाभळा पेक्षाही जास्त आहे). यात विरघळणारे कर्बोदके व विटामिन्स भरपूर असतात. पचनक्षमता 68 ते 73 टक्के असून, हा चारा अत्यंत मऊ व पचायला सोपा असतो. हदग्यामध्ये कोणताही उग्र वास किंवा विषारी घटक (जसे सुबाभळात मिमोसिन असते) नसतो. त्यामुळे हा पाला ताजा व थेट जनावरांना खायला दिला जाऊ शकतो. हे प्रथिनांचे पॉवरहाऊस असल्यामुळे दुभत्या गायी/म्हशींना रोज 4 ते 5 किलो व शेळ्या -मेंढ्यांना रोज 1 किलोपर्यंत पाला इतर सुक्या चाऱ्यासोबत किंवा कुट्टीत मिक्स करुन द्यावा. शेळीपालनामध्ये हदग्याचा पाला सर्वोत्तम मानला जातो. यामुळे शेळ्यांचे वजन वेगाने वाढून गाभण शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. अंजन- अंजन हा प्रामुख्याने कमी पावसाच्या व खडकाळ भागात आढळणारा एक बहुगुणी वृक्ष आहे. उन्हाळ्यात जेव्हा इतर सर्व पिके वाळतात, तेव्हा अंजन पूर्णपणे हिरवागार राहतो. अंजनाच्या पानात प्रथिनांचे प्रमाण 10 ते 15 टक्के असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात कॅल्शियमचे प्रमाण सामान्य गवतापेक्षा 2 ते 3 पट जास्त असते. पचनक्षमता 55 ते 62 टक्के असुन हा चारा चवीला चांगला असल्याने जनावरे तो आवडीने खातात. पाला जनावरांना ताजा व थेट खायला दिला जाऊ शकतो. मोठ्या जनावरांना (गाई/म्हशी) रोज 5 ते 6 किलो व शेळ्या-मेंढ्यांना रोज 1 ते 1.5 किलो पाला इतर सुक्या चाऱ्यासोबत (कडबा किंवा कुट्टीत) मिक्स करून द्यावा. वाढत्या वयाच्या वासरांसाठी व गाभण जनावरांसाठी हा पाला उत्तम ‘प्रथिने व कॅल्शियम सप्लीमेंट’ म्हणून काम करतो.
कडुनिंब- कडुनिंब हे भारतात प्रत्येक भागात सहज आढळणारे झाड आहे. चारा टंचाईच्या काळात याचा वापर प्रामुख्याने म्हशी व शेळ्यांसाठी केला जातो. कडुनिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 15 ते 18 टक्के इतके उत्तम असते. यात लोह, पोटॅशियम व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. पचनक्षमता 50 ते 55 टक्के एवढी आहे. पानांमध्ये अझाडिराक्टिन व लिमोनीन या घटकांमुळे पाला चवीला खूप कडू असतो. त्यामुळे गाई हा पाला सहज खात नाहीत, पण म्हशी व शेळ्या तो आवडीने खातात. गाईंना देण्यासाठी कडुनिंबाचा पाला कापून 4 ते 5 तास उन्हात सुकवुन किंवा थोड्या मिठाच्या पाण्यात बुडवून इतर सुक्या चाऱ्यासोबत मिक्स करुन दिल्यास त्याचा कडूपणा कमी होतो. म्हशींना रोज 4 ते 5 किलो तर शेळ्यांना 308 ते 500 ग्रॅम पाला देणे पुरेसे आहे. शेवरी- पशुधनासाठी एक उत्कृष्ट अपारंपरिक बहुवर्षीय चारा पीक आहे. हे एक अत्यंत पौष्टिक, द्विदल (Leguminous) व बहुवर्षीय झाड-झुडूपवर्गीय चारा पीक असुन हे प्रामुख्याने कोरडवाहू, क्षारयुक्त व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीवरही उत्तम वाढते. शेळ्या, मेंढ्या, गाई व म्हशींसाठी हा एक उत्तम प्रथिनयुक्त पर्याय आहे.शेवरी हा प्रथिनांचा एक अत्यंत समृद्ध नैसर्गिक स्त्रोत आहे काही पोषक जमिनीत हे प्रमाण 30 टक्के पर्यंत असू शकते, जे दुग्ध उत्पादनासाठी सर्वोत्तम मानले जाते. पचनक्षमता 65 ते 75 टक्के असुन तंतुमय पदार्थ 14 ते 18 टक्के इतके आहे. फायबरचे प्रमाण संतुलित असल्याने जनावरांना पचनाचा त्रास होत नाही. शेवरी हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरावते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. हे पीक अवर्षणाचा (दुष्काळाचा) सामना करु शकते व कडक उन्हाळ्यातही हिरवा चारा देते. एकदा लागवड केल्यावर हे झाड 3 ते 5 वर्षे सलग चारा देते. याची छाटणी केल्यानंतर पुन्हा वेगाने फूट फुटते. लागवडीनंतर साधारणपणे 3 ते 4 महिन्यांनी (झाड 4 ते 5 फूट उंच झाल्यावर) पहिली कापणी करता येते. पहिल्या कापणीनंतर दर 50 ते 60 दिवसांनी नियमित चारा मिळतो. झाडाची छाटणी जमिनीपासून 2.5 ते 3 फूट उंचीवर करावी, जे नवीन फुटव्यांसाठी फायदेशीर ठरते. शेवरी हा प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असल्याने तसेच त्यात काही प्रमाणात टॅनिन्स असल्याने तो इतर एकदल चाऱ्यासोबत (उदा. हत्ती गवत, मका किंवा कडबा) 1.3 या प्रमाणात (25% शेवरी 75% इतर चारा) मिक्स करून द्यावा. शेळ्यांसाठी शेवरी हा अमृत आहार मानला जातो. शेळ्या झाडाची पाने व कोवळ्या फांद्या अत्यंत आवडीने खातात, ज्यामुळे त्यांचे वजन वेगाने वाढते. दुभत्या जनावरांना शेवरीचा चारा दिल्यास महागड्या पेंडीचा खर्च कमी होतो व दुधातील फॅटचे प्रमाण सुधारण्यास मदत होते. उसाचे वाढे- ऊसाचे वाढे चारा टंचाईच्या काळात जनावरांसाठी सर्वात मोठे व खात्रीशीर संकटमोचक मानले जाते. राज्यात उन्हाळयात व ऑक्टोबर हिटच्या काळात जेव्हा पारंपारिक हिरवा चारा संपतो, तेव्हा उसाचे शेंडे जनावरांचे पोषण करण्यात मोठी भूमिका बजावतात हा दुष्काळ किंवा चाऱ्यांच्या टंचाईच्या काळात पशुधनासाठी महत्वाचा पर्यायाी चारा मानला जातो. संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,नंदुरबार

