विकसित महाराष्ट्र–२०४७ : राज्यातील १०० पर्यटन सबसर्किटच्या निर्मितीसाठी भागधारकांशी विचारविनिमय
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अनुषंगाने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावित पर्यटन सबसर्किटची यादी अंतिम करण्यापूर्वी पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांच्या सूचना, अभिप्राय व शिफारसी जाणून घेण्यासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक, पर्यटन व्यावसायिक, संबंधित संस्था व प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. यावेळी प्रस्तावित पर्यटन सबसर्किटची निवड, पर्यटनस्थळांचे भौगोलिक व विषयाधारित वर्गीकरण, पर्यटन विकासाच्या संभाव्य संधी, पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, पर्यटनस्थळांची उपलब्धता तसेच स्थानिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान सहभागी भागधारकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पर्यटनस्थळे, पर्यटनाची वैशिष्ट्ये, नव्या पर्यटन संधी तसेच पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण सूचना व शिफारसी मांडल्या. या सूचनांच्या आधारे प्रस्तावित पर्यटन सबसर्किट अधिक सर्वसमावेशक, व्यवहार्य आणि पर्यटकाभिमुख करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच स्थानिक पर्यटन संसाधनांचा प्रभावी वापर, पर्यटनस्थळांमधील परस्पर जोडणी आणि स्थानिक रोजगार व आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, “विकसित महाराष्ट्र–2047 या संकल्पनेत पर्यटन क्षेत्राला राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे महत्त्वपूर्ण साधन म्हणून स्थान देण्यात आले आहे. राज्यातील पर्यटनाची भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि साहसी अशी विविधांगी वैशिष्ट्ये लक्षात घेऊन 100 पर्यटन सबसर्किट विकसित करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचा प्रत्यक्ष सहभाग आणि त्यांचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. या बैठकीत प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या भागधारकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसींचा विचार करून पर्यटन सबसर्किटची अंतिम यादी अधिक व्यापक, समतोल आणि दीर्घकालीन पर्यटन विकासाला पूरक करण्याचा पर्यटन संचालनालयाचा प्रयत्न राहील.”
या बैठकीतून प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसींचे संकलन व परीक्षण करून प्रस्तावित 100 पर्यटन सबसर्किटच्या अंतिम आराखड्याच्या निर्मितीसाठी त्यांचा विचार करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास, पर्यटन पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करणे तसेच स्थानिक समुदायांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र–2047 च्या दिशेने महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला नियोजनबद्ध, शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याच्या दृष्टीने 100 पर्यटन सबसर्किटचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

