विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत ‘कोकण कट्टा’ ने केली दिवाळी साजरी
यावेळी कर्मचारी बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत आनंद साजरा करण्यात आला. रोज आपला आनंद बाजूला ठेवून अनेकांच्या दुःखात सहभागी होणारे, समाजाच्या शेवटच्या कार्यात निष्ठेने सेवा देणारे हे बांधव खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना भेट देऊन कर्तव्य बजावणे, हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्मशानभूमीतील असावरे, तेंडुलकर व सर्व कर्मचारी बांधव आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच कोकण कट्टासाठी खरा दिवाळीचा दिवा ठरला.
यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, दादा गावडे, सुजित कदम, प्रथमेश पवार, दया मांडवकर, निशिकांत मोरे, सचिन दिवाळे, देऊ डामरे, मधू हेगडे संतोष तोडणकर, मनिष माईन आदी सदस्य उपस्थित होते. “सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ” या ब्रीदवाक्याखाली कोकण कट्टाचे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर सुरू असतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा हा उपक्रम पुढील वर्षीही असाच सुरू राहील, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.

