कागलमध्ये उभारणार जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’; वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव, त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘शाहू सृष्टी’ हे केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या दालनात आज प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. याबाबत थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर आदी उपस्थित होते.

