‘रांजणगावाला महागणपती नांदाला…’च्या सुरात लोकसंस्कृतीचा जल्लोष!
(नंदुरबार) मंगल गणेश वंदना, टिपरी नृत्य, ‘गणरंग – सुरांची मैफल’ आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी नंदुरबारमधील ‘महागणेशोत्सव 2026’ रंगला.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे ‘लोकसंवाद 2026’ व ‘महागणेशोत्सव 2026’आयोजित करण्यात आला.
‘रांजणगावाला महागणपती नांदाला…’ आणि ‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता…’ या भक्तिगीतांनी कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
पारंपरिक टिपरी नृत्य, संगीत, नृत्याविष्कार आणि शहीद शिरीषकुमार यांची जीवनगाथा यांसारख्या सादरीकरणातून महाराष्ट्राची समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायला मिळाला.
गणेशोत्सव साधेपणाने, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच लोककला व सांस्कृतिक परंपरांचे जतन-संवर्धन करून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
संगीत, नृत्य आणि लोककलेच्या सुरेल संगमाने नंदुरबारमध्ये महागणेशोत्सवाची सांस्कृतिक मैफल अविस्मरणीय ठरली.
Follow Us:

