प्रशासकीय कामकाजात गतिमानता व कार्यक्षमता वाढविण्यावर भर
(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत विभागनिहाय प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊन त्यावरील कार्यवाहीची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित पाठपुरावा करून नियमाप्रमाणे व कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
ई-ऑफिस प्रणालीद्वारे प्राप्त टपाल संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याच दिवशी पाठविण्याचे निर्देश अभिलेख कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात आले. कार्यालयीन वेळेत बाहेर जाताना हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करणे तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी फेसॲपद्वारे उपस्थिती नोंदविणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
वैयक्तिक वनदाव्यांमधील प्रलंबित प्रकरणांची तपासणी करून पात्र दाव्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आपले सरकार व पी.जी. पोर्टलवरील नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करून तक्रारदारांना समाधानकारक उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Follow Us:

