सेवा संकल्प अभियान – २०२६: उमेद अभियानातंर्गत नंदुरबार येथे जिल्हास्तरीय समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) संवाद कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न!
CRP महिलांना ग्रामीण परिवर्तनाच्या शिल्पकार बनण्याचे आवाहन; ‘लखपती दीदी’ निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना
समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) या केवळ कर्मचारी नसून ग्रामीण परिवर्तनाच्या खऱ्या शिल्पकार आणि रणरागिणी आहेत. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक गावात ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले.
CRP कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नमन गोयल यांनी बचत गटांच्या Cut-Off, नियमित मासिक बैठका तसेच ‘Digital Aajeevika Register’ यावर शंभर टक्के काम करून पारदर्शकता वाढविण्याच्या सूचना दिल्या. महिलांना केवळ कर्जपुरते मर्यादित न ठेवता शेवगा पावडर, मशरूम उत्पादन, दूध संकलन यांसारख्या स्थानिक उद्योगांच्या माध्यमातून त्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘सेवा संकल्प अभियान’ ही समाजसेवेची महत्त्वपूर्ण संधी असून त्याचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
CRP दीदींच्या परिश्रमामुळे जिल्ह्याची वेगळी ओळख
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) परमेश्वर राऊत यांनी मार्गदर्शन करताना नंदुरबार जिल्ह्याने NPA वसुली आणि बँक कर्जाच्या क्षेत्रात राज्यात निर्माण केलेल्या आदर्श कामगिरीचे श्रेय CRP दीदींच्या अथक परिश्रमाला दिले.
गावाचे १०० टक्के Saturation करताना एकही पात्र महिला बचत गटाच्या माध्यमातून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. समुदाय गुंतवणूक निधी (CIF) तसेच बँक कर्जाचा वापर उत्पादक कामांसाठीच व्हावा, यावर त्यांनी विशेष भर दिला.
प्रभागसंघाचे व्यवस्थापन, लेखे आणि अंतर्गत ऑडिट वेळेत पूर्ण करणे हे सुशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच ‘लखपती दीदी’ंची संख्या दुप्पट करण्यासाठी प्रत्येक CRP ने किमान पाच महिलांना वैयक्तिक उद्योगासाठी बँक कर्जाचा प्रस्ताव तयार करण्यास मदत करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांनी केले. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात कार्यशाळा पार पडली.

