जनगणना-2027 : दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या प्रशिक्षणास प्रारंभ
(नंदुरबार) जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात आयोजित प्रशिक्षणावेळी जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक अजय ठाकूर, श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी, तहसीलदार, मुख्याधिकारी व जनगणना कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया पूर्ण झाली असून, फेब्रुवारी 2027 पासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र माहिती संकलित केली जाणार असून, 40 प्रश्नांद्वारे माहिती घेतली जाणार आहे.
लोकसंख्या 800 पेक्षा अधिक असलेल्या इन्युमरेशन ब्लॉकची आवश्यकतेनुसार पुनर्रचना करण्यासह संक्षिप्त गृहसूची, प्रगणक गट, नकाशांचे पुनरावलोकन व गणना घरांचे वाटप याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
जनगणनेतील माहिती अत्यंत गोपनीय असल्याने ती अनधिकृत व्यक्तींना देऊ नये. अचूकता, गोपनीयता आणि वेळेचे नियोजन राखून सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.
विज्ञापित
Follow Us:

