चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत टोकरतलाव शाळेला नंदकुमार बेडसे यांची भेट

यावेळी जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभागाचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे तसेच नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी जयंत चौरे उपस्थित होते.
भेटीदरम्यान नंदकुमार बेडसे यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेतील शालेय पोषण आहार व्यवस्थेची पाहणी करताना विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार, त्याची गुणवत्ता, स्वच्छता, पाककृती व व्यवस्थापन याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत स्वतः पोषण आहाराचा आस्वाद घेतला व आहाराच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच जादुचा पेटारा साहित्य पेटी, ‘जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी उपक्रम’ अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी, उपक्रमाचा विद्यार्थ्यांकडून केला जाणारा वापर, अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून होत असलेले प्रयत्न आणि उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणारा शैक्षणिक लाभ याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी उपक्रमांतर्गत केलेल्या अभ्यासाची माहिती उत्स्फूर्तपणे सांगितली. बेडसे यांनी शाळेतील विविध वर्गांना भेट देऊन वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. शिक्षकांकडून वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रश्नोत्तरांची पद्धत, अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची विषय समजून घेण्याची क्षमता याबाबत त्यांनी बारकाईने माहिती घेतली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने व मोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीबरोबरच करिअर, विविध क्षेत्रांतील संधी आणि जीवनातील ध्येय-उद्दिष्टांबाबत अनेक प्रश्न विचारले. बेडसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शनपर उत्तरे देत त्यांना अभ्यास, जिज्ञासा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले. नंदकुमार साहेब यांच्या या प्रेरणादायी शाळा भेटीमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना निश्चितच नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली असून, गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या दिशेने अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

