जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ५ हजार कोटींचे सामंजस्य करार; ७,७७८ रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा

नंदुरबार : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध उद्योगांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून जिल्ह्यात तब्बल ७ हजार ७७८ रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ५ हजार कोटींचे सामंजस्य करार; ७,७७८ रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा
jilhastariya-guntavanuk-parishadet-5-hajar-kotinche-samajhasya-karar-7778-rojgar-nirmiticha-marg-mokala

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा, मनुष्यबळाचा आणि औद्योगिक क्षमतेचा योग्य वापर करून नंदुरबारच्या विकासाला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देतानाच बाहेरील गुंतवणूकदारांनाही नंदुरबारकडे आकर्षित करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे डॉ. सामंत यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग क्षेत्रातील विविध प्रतिनिधी, उद्योजक आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या वेळी उद्योगांच्या अडचणी, आवश्यक पायाभूत सुविधा, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी

जिल्ह्यात होणाऱ्या गुंतवणुकीचा सर्वाधिक लाभ स्थानिक युवकांना मिळावा, यासाठी उद्योगांनी स्थानिक मनुष्यबळाला रोजगार देण्यावर भर द्यावा, असे आवाहनही मंत्री डॉ. सामंत यांनी केले. उद्योग उभारणीसोबतच स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध झाल्यास जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाने संबंधित उद्योजकांशी समन्वय ठेवून कामे गतिमान करावीत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या गुंतवणूक परिषदेमुळे नंदुरबारच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आशादायी वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात जिल्ह्यात नवीन उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250