साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली दाद

शहादा : येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्था व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि संचालक-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात समारोप झाला. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित या महोत्सवात तब्बल ६५० स्पर्धकांनी सहभाग घेत विविध कलाप्रकारांत आपले कौशल्य सादर केले. समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली दाद
sane-guruji-vidya-prasarak-mandal-kala-mahotsavat-vidyarthyanchya-kalagunanna-milali-dad

मंडळाच्या सरदार पटेल सभागृह तसेच महात्मा गांधी सभागृहात या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माध्यमिक शालेय आणि महाविद्यालयीन अशा दोन गटांत विविध ११ कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी, मेहंदी, चित्रकला, कोलाज, वक्तृत्व, मातीकला, समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, मूकनाट्य, सुगम गायन तसेच इतर सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. यावेळी शहादा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ईश्वर शिरसाठ, माधवी मळरंद पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक नूह नुरानी, विविध संस्थांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, परीक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. “अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो,” असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धांमध्ये माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रांगोळी, मेहंदी, चित्रकला, कोलाज, वक्तृत्व, माती कला, समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, मूकनाट्य आदी प्रकारांत विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. महाविद्यालयीन गटातही विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत परीक्षकांची दाद मिळविली.

माध्यमिक गटातील रांगोळी स्पर्धेत प्रतिज्ञा रविंद्र गिरासे हिने प्रथम, जान्हवी नरोत्तम पाटील हिने द्वितीय, तर दामिनी उमेश गिरासे हिने तृतीय क्रमांक मिळविला. मेहंदीमध्ये प्रियंका ताराचंद पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. समूह लोकनृत्य, लोकगीत, मूकनाट्य, चित्रकला, कोलाज आणि मातीकला या प्रकारांतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.

महाविद्यालयीन गटातील विविध स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. समूह लोकनृत्य, लोकगीत, रांगोळी, मेहंदी, माती कला, मूकनाट्य, चित्रकला, कोलाज, वक्तृत्व व गायन या स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विविध संस्थांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारामुळे महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, सर्व विद्याशाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, संस्थांतर्गत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, संयोजक आणि समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले.

तीन दिवस रंगलेल्या या कला महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250