महिला महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती’ अभियानाचा शुभारंभ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कुंवर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल शाहीदिनान यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. मधुकर देसले यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ. श्रीराम दाऊतखाने यांनी विद्यापीठ विद्यार्थी हितासाठी राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती विद्यार्थिनींना दिली. उपलब्ध योजनांचा आणि उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
‘आत्मनिर्भर युवती अभियानाच्या’ उद्घाटनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत चेतना गोसावी यांनी उद्योजकतेचा प्रवास आणि अनुभव विद्यार्थिनींसमोर मांडला. या मुलाखतीत त्यांनी महिला यशस्वी उद्योजिका कशी बनू शकते, याबाबत मार्गदर्शन केले.
“कोणतेही काम लहान नसते. अगदी घरातून एखादा छोटासा व्यवसाय सुरू करूनदेखील त्याला मोठे स्वरूप देता येते,” असे सांगत त्यांनी स्वतःच्या अनुभवातून विविध उदाहरणे विद्यार्थिनींसमोर ठेवली. उद्योग क्षेत्रात महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुनील कुंवर यांनी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रांत पुढे येऊन उद्योजक किंवा अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवावे, असे सांगितले. आत्मनिर्भरतेसाठी कौशल्य, आत्मविश्वास आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. मधुकर देसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी विकास विभागातील सदस्यांनी सहकार्य केले. महिला विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, उद्योजकतेची जाणीव आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

