महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट ठरणार मैलाचा दगड: जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल
(सारंगखेडा) महिलांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी, त्यांना ज्ञान, धाडस आणि समाजात स्वतःची स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी 'महिला बचत गट' अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे म्हणजेच खरे महिला सक्षमीकरण आहे. यासाठी शासन बचत गटांना विशेष प्राधान्य देत असून, विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल(भाप्रसे) यांनी केले.
सारंगखेडा येथील उद्योगांची पाहणी शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान) अंतर्गत सुरू असलेल्या विविध महिला बचत गटांच्या उद्योगांना मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये ‘राधेश्याम स्वयं साहायता समूह’ आणि ‘दत्तप्रभू कृपा जलधारा’ या बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उद्योगांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या परिसरातील महिला बचत गटांचे व्यवसाय उत्तम प्रगतीपथावर असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
‘लखपती दीदी’ उपक्रमावर भर या भेटीदरम्यान नमन गोयल यांनी महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या उद्योगांविषयी आणि उत्पन्नाविषयी चर्चा केली. ते म्हणाले, “उमेद अभियान आता केवळ बचत आणि कर्जपुरत्या मर्यादित राहिलेले नाही. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. ‘लखपती दीदी’ हा त्यातील महत्त्वाचा उपक्रम असून, प्रत्येक बचत गटातील किमान एका महिलेचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांनी या सर्व संधींचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसायात पुढे यावे.” असे आवाहन यावेळी करण्यांत आले.

