धडक कारवाई: धडगाव परिसरात तब्बल एक कोटी रुपयांची बेकायदेशीर गांजाची शेती उद्ध्वस्त!
धडगाव :धडगाव तालुक्यातील गेडा शिवारात एका शेतात बेकायदेशीररीत्या सुरू असलेली गांजाची शेती पोलिसांनी धाड टाकून पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ५ लाख १७ हजार रुपये किमतीची २१० किलो ३८० ग्रॅम वजनाची हिरवीगार गांजाची झाडे जप्त केली असून, याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली कारवाई:गेडा गावच्या शिवारातील वनपट्ट्याच्या शेतात एका इसमाने लपून-छपून गांजाची झाडे लावली असून तो त्याची व्यावसायिक शेती करत असल्याची गोपनीय माहिती धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने गेडा उंबरपाडा शिवारातील संशयास्पद शेतात जाऊन धाड टाकली.
पोलिसांनी पाहणी केली असता, शेतात इतर पिकांच्या आडून मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. पोलिसांनी शेतातून मुळासकट उपटून काढलेली आणि पांढऱ्या कापडात बांधलेली अंदाजे ३ ते ५ फूट उंचीची एकूण १४ गांजाची झाडे जप्त केली. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत बाजारात १ कोटी ५ लाख १७ हजार रुपये इतकी आहे.
संशयिताला अटक आणि गुन्हा दाखल:या बेकायदेशीर शेतीप्रकरणी पोलिसांनी पोकॉ. जलसिंग वाडव्या यांच्या फिर्यादीवरून शेतमालक आलशा मानसिंग पावरा (वय ४०, रा. गेडा उंबरपाडा) याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(आय आय)(क) अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.
या पथकाने बजावली कामगिरी:सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, आणि शहादाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडगावचे पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हेकॉ. शिवलाल पावरा, हेकॉ. सुभाष तमखाने, पोकॉ. विश्वजीत चव्हाण, पोकॉ. मनिष पावरा, पोकॉ. अशोक पाडवी, पोकॉ. किरण भिल, पोकॉ. दिपक मालवे, पोकॉ. जलसिंग वसावे, पोकॉ. किरण पाडवी, पोकॉ. मानसिंग वळवी, पोकॉ. प्रशांत यादव, आणि चापोना. सुनिलकुमार सूर्यवंशी यांच्या पथकाने अत्यंत धाडसाने यशस्वी केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थांची शेती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Follow Us:

