डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये नेत्रदान जनजागृती; विद्यार्थिनींनी घेतली नेत्रदानाची शपथ

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शाळेतील विद्यार्थिनींच्या सहभागातून नेत्रदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थिनींनी नेत्रदानाचे महत्त्व दर्शविण्यासाठी मानवी साखळीच्या माध्यमातून आकर्षक मानवी आकृती साकारली. तसेच नेत्रदानाचा संदेश देणारे विविध फलक व प्रतीकात्मक चिन्हे तयार करून परिसरात जनजागृती करण्यात आली.
यावेळी रॅलीद्वारे नेत्रदानाचे महत्त्व सांगणारे संदेश व घोषवाक्ये देत परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. डॉ. काणे गर्ल्स विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान नेत्रदान समुपदेशक प्रियांका दिवरे यांनी विद्यार्थिनींना नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नेत्रदानामुळे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणता येतो, त्यामुळे समाजातील अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनी व शिक्षकवृंदाकडून नेत्रदानाची शपथ घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी आणि नेत्र शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र खेडकर यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले.
नेत्रदान समुपदेशक प्रियांका दिवरे यांनी नेत्रदानाची सामाजिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नेत्रदानाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.

