ग्रामीण, आदिवासी भागातील आरोग्यसेवेसाठी CSR निधीचा परिणामकारक वापर करा : आरोग्यमंत्री आबिटकर
ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) गरजाधारित, नियोजनबद्ध आणि परिणामकारक वापर करावा. राज्य शासनाच्या आरोग्यविषयक उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
भारतीय औद्योगिक परिसंघातर्फे ताज हॉटेल येथे आयोजित ‘सीएसआर समिट’च्या उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भारतीय औद्योगिक परिसंघाच्या सीएसआर समितीचे अध्यक्ष बी. थिआगाराजन, माजी अध्यक्ष राजेश शहा, शिवानी कुमार यांच्यासह विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सामाजिक विकासाच्या प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या घटकांपर्यंत आवश्यक सुविधा पोहोचविण्यासाठी सीएसआर हे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांत शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. त्याला सीएसआरची नियोजनबद्ध जोड मिळाल्यास विकासकामांची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढू शकते. आरोग्य विभागातील सीएसआर उपक्रमांना सुसूत्रता आणण्यासाठी आणि उपलब्ध निधीचा गरजेनुसार वापर व्हावा, यासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. विभागाच्या प्राधान्यक्रमानुसार उद्योगांनी सीएसआर उपक्रमांची आखणी केल्यास निधीचा अधिक परिणामकारक उपयोग होईल. शासन, उद्योग आणि संबंधित भागधारकांमध्ये सातत्यपूर्ण संवाद व समन्वय आवश्यक असल्याचेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

