१७ सप्टेंबरला धावणार ‘बीड–पुणे’ रेल्वे; डिसेंबरअखेर ‘बीड–मुंबई’ सेवेसाठी युद्धपातळीवर कामे
बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच, डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिल्या.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे ‘अहिल्यानगर–बीड–परळी’ या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाली. गतवर्षी बीडकरांची ४० वर्षांची प्रतीक्षा संपवून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी (१७ सप्टेंबर २०२५ रोजी) ‘बीड ते अहिल्यानगर’ रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरू झाली आणि आता यावर्षी त्याच ऐतिहासिक दिनी ‘बीड–पुणे’ रेल्वे सेवा सुरू होत आहे.
यामुळे बीडच्या कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव आदी उपस्थित होते.

