जी.टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; गुणवंत खेळाडूंचा गौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रंकी पवार या विद्यार्थिनीचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर खेळाडूंनाही प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रा. डॉ. रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रगती करण्याचे आवाहन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासोबतच मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे केवळ स्पर्धेच्या दृष्टीने न पाहता निरोगी आणि सक्षम व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम म्हणून पाहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. एस. पी. पाटील, क्रीडा संचालक डॉ. टी. एल. कस, डॉ. एम. आर. पाटील, एस. डी. घाटे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. वाघमारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, क्रीडा विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. डी. घाटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कामगिरीचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश संपादन करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

