मुंबई विमानतळाजवळ उभारणार अत्याधुनिक ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’; ३९ खोल्यांची सुविधा
विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान विश्रांतीची सोय, गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई विमानतळाजवळ विलेपार्ले येथे प्रस्तावित ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असावे, अशा सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. अतिथीगृहात वाहनचालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
नंदगिरी राज्य अतिथीगृहाच्या प्रस्तावित आराखडा सादरीकरण बैठकीत राजा अदारे आर्किटेक्ट यांच्याकडून प्रस्तावित इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री रावल यांनी आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.
प्रस्तावित अतिथीगृहाची इमारत चार बेसमेंटसह सहा मजली असणार आहे. यामध्ये रिसेप्शन, वेटिंग एरिया तसेच ४२ वाहनांच्या पार्किंगची सुविधा असेल. अतिथींसाठी एकूण ३९ खोल्या प्रस्तावित असून, त्यात एक्झिक्युटिव्ह सुइट आणि प्रेसिडेन्शियल सुइटचाही समावेश आहे.

