ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) युनियनच्या डीएनएई १३६ या संघटनेने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ राज्यभर मुक्काम मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार नंदुरबार येथे १ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी तसेच सरपंचांनी मोर्चा काढला.
ग्रामसेवकांची संख्या कमी करून प्रशासन व कारभारावरील अनावश्यक ताण कमी करावा, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील मानसिक, सामाजिक आणि प्रशासकीय दबाव कमी करून ठोस संरक्षण द्यावे, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तसेच पूर्व परवानगीशिवाय शासकीय कार्यालयातील व्हिडिओ चित्रीकरणास प्रतिबंध करावा, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि ग्रामसभांच्या नियमावलीत सुधारणा करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या मुक्काम मोर्चात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे डीएनएई १३६चे नंदुरबार जिल्हाध्यक्ष दौलत कोकणी, जिल्हा सरचिटणीस गणेश मोरे यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मोर्चादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.

