शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणाऱ्या टोळीचा नंदुरबार तालुका पोलिसांकडून पर्दाफाश; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी पाण्याच्या मोटारी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पाच इलेक्ट्रिक मोटारी आणि वॉटर हाऊस पंप असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमुळे नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चार गुन्हे, तसेच गु.र.नं. २७८/२०२५ मधील एक गुन्हा, असे एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी गणेश आप्पा भिल, सोमा गोमा भिल, बादल मनोज भिल आणि समाधान रविंद्र भिल, सर्व रा. खोक्राळे, ता. जि. नंदुरबार, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश पवार तसेच पोलीस कर्मचारी किरण कांबळे, मनोज पाटील, धनराज राठोड, राजेंद्र पाटील, दादाभाऊ वाघ, योगेश सोनार, सचिन सैंदाणे, यशवंत आगळे आणि राहुल पांढारकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

