गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी; मुंबईत १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष महोत्सव
गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची विशेष मेजवानी अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महत्वाचा उत्सव असून, त्याला संगीत, कला, भक्ती आणि लोकपरंपरेची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या उत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित या शास्त्रीय संगीत महोत्सवातून आठ दिवस विविध नामवंत कलाकारांच्या गायन व वादनाची सुरेल मेजवानी रसिकांना मिळणार आहे. अभिजात शास्त्रीय संगीताची परंपरा जतन, संवर्धन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

