प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षितता जपावी, ‘लोकसंवाद-२०२६’ च्या माध्यमातून संदेश

नाशिक: गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि भक्तीचा सण आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वत:सह इतरांचीही सुरक्षितता जपावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजय करे यांनी केले.
प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षितता जपावी, ‘लोकसंवाद-२०२६’ च्या माध्यमातून संदेश
loksamvad-traffic-safety-message

जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक आणि युवा लोकसंवादक्रांती गणेश मंडळ, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत  नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रविण बावा, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, अशोक सानप, बापू गाडे, हेमंत वर्मा यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

विज्ञापित

पोलिस निरीक्षक करे यांनी गणेशोत्सवाच्या काळातील वाहतूक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये तसेच मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे. वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक आणि पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंडळाच्या स्वयंसेवकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ या अभिनव डिजिटल उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, सांस्कृतिक परंपरा, वारसा आणि कुटुंबाच्या स्मृती डिजिटल माध्यमातून जतन करून त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. उत्सवाचा आनंद घेताना वाहतूक शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे आणि प्रशासन यांनी परस्पर सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: