नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यावरण पुनर्संचयन आराखड्यावर कार्यशाळा संपन्न!
(नंदुरबार) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत (UNDP) राबविण्यात येणाऱ्या भू-ऱ्हास तटस्थता प्रकल्पाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचा पर्यावरण पुनर्संचयन आराखडा व जमीन वापर आराखड्याच्या सादरीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली.
जिल्हाधिकारी तथा भूदृश्य स्तरीय समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेत अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा या तीन तालुक्यांसाठी पर्यावरण पुनर्संचयन आराखडा सादर करण्यात आला. शेती, वन, गवताळ प्रदेश व पाणथळ या चार परिसंस्थांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी प्रत्येक सामुदायिक वन संसाधन क्षेत्रासाठी स्वतंत्र पाणलोट आधारित नियोजन करण्याचे निर्देश दिले. सामुदायिक वन संसाधन व्यवस्थापन समित्यांचे प्रशिक्षण, स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यांना प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. तसेच प्रकल्पाच्या सर्व उपक्रमांसाठी कार्यवेळापत्रक तयार करण्याच्या सूचनाही केल्या.
पर्यावरणीय ऱ्हास रोखून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, दीर्घकालीन मालमत्ता निर्मिती आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Follow Us:

