‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड
राज्यातील घरे, स्थानिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, ऐतिहासिक मंदिरे आणि परदेशातील भारतीय समुदायांच्या गणेशोत्सवातील आठवणींचे डिजिटल जतन या उपक्रमातून करण्यात येत आहे. छायाचित्र आणि गणेशोत्सवाशी संबंधित माहिती पोर्टलवर सादर करणाऱ्या प्रत्येक नागरिक, मंडळ अथवा मंदिर न्यासाला महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक प्रमाणपत्र’ देण्यात येते. वैशिष्ट्यपूर्ण नोंदींची दररोज निवड करून शासनाच्या माध्यमांद्वारे त्यांना प्रसिद्धी देण्यात येत आहे.
गुहागरची पारंपरिक गौरी-गणपती प्रथा
कोकणातील गुहागर परिसरात महिला डोक्यावर पारंपरिक पितळी ताटामध्ये गौरीची मूर्ती, पूजेचे नारळ आणि रानातील तेरड्याचे देठ घेऊन हिरव्यागार भातशेती व गावातील पाणवाटांमधून सामूहिकरित्या मार्गक्रमण करतात. शेती, निसर्ग, स्त्रीशक्ती आणि पूर्वजांच्या परंपरेशी नाते सांगणाऱ्या या शतकानुशतकांच्या प्रथेची निवड करण्यात आली आहे.
निकिता जे. पांचाळ यांची घरच्या घरी मातीची मूर्ती
निकिता जे. पांचाळ यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसची बाजारातील मूर्ती आणि कृत्रिम रंगांचा वापर टाळला. त्यांनी कच्च्या मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती घडवून स्वतः रंगकाम केले. पारंपरिक मातीकलेचे जतन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा त्यांचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.
संजय मंगलाराम यांच्या पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच बाप्पाचे आगमन
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जाणाऱ्या संजय मंगलाराम यांच्या कुटुंबाने यंदा पुण्यातील नव्या घरात पहिल्यांदाच गणरायाचे स्वागत केले. कुटुंबातील दोन लहान मुलींनी दैनंदिन पूजा आणि आरतीचे नेतृत्व केले. नव्या पिढीकडे परंपरेचा वारसा सोपविणाऱ्या या कौटुंबिक गणेशोत्सवाचीही निवड झाली आहे.

