विज्ञापित

चाळीस हजाराची लाच घेतांना पोलिस पाटीलसह त्याचा साथीदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला

नंदुरबार : पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊ न देता एका प्रकरणात तडजोड करून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या बिलमांजरे येथील पोलिस पाटीलसह एका खासगी इसमाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत उर्वरित ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले.
चाळीस हजाराची लाच घेतांना पोलिस पाटीलसह त्याचा साथीदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला
police-patil-accomplice-caught-red-handed-while-accepting-rs-40000-bribe-acb-trap

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊ न देता संबंधित प्रकरण आपसात मिटवून देण्यासाठी बिलमांजरे येथील पोलिस पाटील गिरीश नान्या मावची यांनी ७० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापैकी ३० हजार रुपये २९ ऑगस्ट रोजीच घेण्यात आले होते.

विज्ञापित

    दरम्यान, सुमारे तीन महिन्यांपूर्वी तक्रारदार यांच्या मुलाचा एका महिलेशी संपर्क झाल्यानंतर हा प्रकार महिलेच्या पतीच्या निदर्शनास आला. त्यानंतर संबंधित कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. या प्रकरणी महिलेच्या पतीने संबंधित मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली होती.

    तक्रार दाखल होऊ न देता प्रकरण मिटवून देण्यासाठी पोलिस पाटील गिरीश मावची आणि खासगी इसम कांतीलाल रुबजी गावित (रा. आमपाडा) यांनी तक्रारदाराकडे ७० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.

    तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी उर्वरित ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गिरीश नान्या मावची आणि कांतीलाल रुबजी गावित यांना पथकाने रंगेहाथ पकडले. दोघांना अटक करण्यात आली आहे.

    या प्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ आणि ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलिस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलिस निरीक्षक संदीप पाटील तसेच विलास पाटील, विजय ठाकरे, संदीप खंडारे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले आणि हेमंतकुमार महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: