जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!

जळगाव/धुळे/नंदुरबार : वाढती विजेची गरज आणि दरमहा येणाऱ्या वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी जळगाव परिमंडलातील घरगुती ग्राहक आता सौरऊर्जेकडे वळत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती!
Power generation on the rooftops of 96,000 homes in Jalgaon Circle!

जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ९६ हजार ६५५ घरांच्या छतांवर ३५७.९७ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून घरगुती ग्राहक केवळ वीज वापरणारे न राहता वीजनिर्मातेही बनू लागले आहेत. ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीजबिल जवळपास शून्य करणे शक्य असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

पूर्वी घरांच्या छतांचा वापर प्रामुख्याने पाण्याच्या टाक्या किंवा अडगळीतले साहित्य ठेवण्यासाठी होत असे. आता याच छतांवर सौर पॅनेल उभारून वीजनिर्मिती केली जात आहे. यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता नसल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना हा पर्याय उपयुक्त ठरत आहे. सौरऊर्जेतून तयार होणारी वीज घरगुती वापरासाठी उपलब्ध होत असल्याने पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व आणि वीजबिलाचा भार कमी करण्यास मदत होत आहे.

घरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते. मात्र, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना शासनाकडून अनुदान दिले जात असल्याने प्रकल्प उभारणीचा आर्थिक भार कमी होतो. त्यामुळे घरगुती ग्राहकांचा सौरऊर्जेकडे कल वाढला आहे. उपलब्ध छताचा वापर करून स्वतःची वीज निर्माण करण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठीही अनुदान देण्यात येत आहे.

घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रणालीद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ६१ हजार ५३५ ग्राहकांनी २३०.४६ मेगावॅट, धुळे जिल्ह्यातील २४ हजार २६७ ग्राहकांनी ८८.२७ मेगावॅट तर नंदुरबार जिल्ह्यातील १० हजार ८५३ ग्राहकांनी ३९.२३ मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संचावर घरावर उभारले आहेत.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: