सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान

नंदुरबार:-नंदुरबार येथील नळवा रोडवरील तांबोळीबारी चौक परिसरात दुर्मीळ मांडूळ (Red Sand Boa) जातीचा बिनविषारी साप आढळून आला. सर्पमित्र ओम कोडग व राहुल कोळी यांनी या सापाची सुरक्षित सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडत जीवदान दिले.
सर्पमित्राने दिले दुर्मीळ मांडूळ सापाला जीवदान
snake-rescuer-gives-new-life-to-rare-red-sand-boa

तांबोळीबारी चौक परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र ओम व राहुल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता तो दुर्मिळ मांडूळ जातीचा बिनविषारी साप असल्याचे निदर्शनास आले. या सापाची लांबी सुमारे चार फूट होती. मांडूळ सापाला स्थानिक भाषेत ‘डबल इंजिन’, ‘दुतोंड्या’ तसेच ‘मालन’ या नावांनीही ओळखले जाते. या सापाची शेपटी आखूड व गोलाकार असल्याने ती तोंडासारखी भासते. त्यामुळे या सापाला दोन तोंडे असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये आढळून येतो. मात्र, प्रत्यक्षात या सापाला एकच तोंड असते. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून मानवासाठी सामान्यतः निरुपद्रवी आहे.
सर्पमित्र ओम कोडग यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. यावेळी त्यांनी नागरिकांमध्ये सापांविषयी जनजागृती करत सापांना न मारता त्यांच्या संरक्षणासाठी सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
मांडूळ सापाबद्दल असलेले गैरसमज दूर करून अशा वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: