उपकार्यकारी अभियंता विनोद काळे यांचा विशेष गौरव : अल्पकाळात पकडली औद्योगिक ग्राहकांची वीजचोरी
महावितरणच्या नंदुरबार ग्रामीण-१ उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता विनोद काळे हे काही दिवसांपूर्वीच रुजू झाले. रुजू होण्याच्या महिनाभरातच त्यांनी घुली शिवारात दोन कारखान्यांतील तब्बल ४७ लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले. याप्रकरणी तीन आरोपींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कामगिरीबद्दल गुरुवारी (३ सप्टेंबर) काळे यांचा महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जगदाळे यांनी काळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. औद्योगिक ग्राहकाकडून मोठ्या प्रमाणात होणारा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणून काळे यांनी महावितरणच्या महसुलाचे नुकसान टाळले. इतर अभियंत्यांनीही यापासून प्रेरणा घेत आपापल्या कार्यक्षेत्रात वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवावी, असे आवाहन जगदाळे यांनी केले.
यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, नंदुरबार मंडलाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, नंदुरबार विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल गायधनी, सहायक अभियंता राकेश चौधरी यांची उपस्थिती होती.

