लॅबग्रोन डायमंडच्या संपूर्ण मूल्यसाखळीची निर्मिती करून भारताने जागतिक नेतृत्व करावे : अमित शाह
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, यांच्यासह रत्न व आभूषण क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार व प्रतिनिधी उपस्थित होते.
भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशीलतेचे सामर्थ्य असून, लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याची मोठी शक्यता आहे. भारतीय कंपन्यांनी जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये विक्री केंद्रे उभारावीत, यासाठी केंद्र सरकार आवश्यक सहकार्य करेल, असे शाह यांनी सांगितले. तसेच रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद केले.
२०२५ मध्ये देशाची रत्न व आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून, या क्षेत्रातून सुमारे ७५ लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. जगातील मोठ्या प्रमाणातील हिऱ्यांची कटिंग व पॉलिशिंग भारतात होते. मुक्त व्यापार करार आणि उपलब्ध सुविधांचा लाभ घेत उद्योगाने नव्या बाजारपेठा शोधाव्यात. असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले. २०४७ पर्यंत भारताला प्रत्येक क्षेत्रात जगातील अग्रणी राष्ट्र बनविण्याच्या संकल्पात रत्न व आभूषण उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
देशाच्या निर्यातीत आणि आर्थिक विकासात रत्न व आभूषण उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान असून, नवी मुंबईतील अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा असून, भारत डायमंड बोर्समुळे निर्माण झालेल्या सक्षम परिसंस्थेने उद्योगाच्या वाढीला चालना दिली आहे. या क्षेत्रातील व्यापार २१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून, उद्योगाला आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्न व आभूषण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ५० टक्के असून, या उद्योगातून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. या क्षेत्रातील सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक देशाच्या आर्थिक विकासाला चालना देत असून, विकसित भारत २०४७च्या उद्दिष्टपूर्तीत रत्न व आभूषण उद्योगाची भूमिका महत्त्वाची राहील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘५२ व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स २०२६’च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने आयोजित सोहळ्यात २७ विविध श्रेणींमध्ये रत्न व आभूषण उद्योगातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँकर्स आणि महिला उद्योजकांचा गौरव करण्यात आला.

