आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक भरतीला वेग; १,६०० उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस सुरुवात

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेस गती देण्यात आली असून, पवित्रपोर्टल मार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, निर्धारित वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक भरतीला वेग; १,६०० उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस सुरुवात
adivasi-ashramshalantil-shikshak-bharatila-veg-1600-umedvaranchya-kagadpatra-padatalanila-suruvat

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागास प्राप्त झाली आहे.
यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील ९२७, माध्यमिक शिक्षक संवर्गातील ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील २५२ उमेदवारांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह अन्य आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर करण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना व वेळापत्रकासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250